"विलेपार्ले येथे रंगलेला GTG : स्वामी आधारवर्धिनीच्या सेवाकार्याचा प्रेरणादायी सोहळा”!
Date:12 September,2026
“दादर येथे यापूर्वी दोन वेळा GTG अर्थात गेट-टुगेदरचे आयोजन झाले होते. बऱ्याच दिवसांपासून विलेपार्ले येथेही असा स्नेहमेळावा आयोजित करण्याची इच्छा मनात होती. योगायोगाने काकूंच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा योग जुळून आला आणि माझ्या जन्मभूमी तसेच कर्मभूमीतच दुपारच्या सत्रात हा सुंदर स्नेहमेळावा पार पडला.
या कार्यक्रमाला तब्बल ८० जणांची उपस्थिती लाभली. मुलं, पालक, देणगीदार, हितचिंतक, सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थेशी विविध माध्यमातून जोडलेली मंडळी यांच्या उपस्थितीने संपूर्ण वातावरण आनंद, आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीने भारून गेले होते.
स्वर्गवासी श्रीमती माधवी बारगोडे यांना श्रद्धांजली
कार्यक्रमाची सुरुवात अत्यंत भावपूर्ण वातावरणात झाली. संस्थेच्या पहिल्या दिवसापासून विश्वस्त म्हणून कार्यरत असलेल्या श्र6मती माधवी बारगोडे यांचे २९ मार्च २०२6रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने संस्थेने एक समर्पित सहकारी गमावला आहे. त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आणि श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
यानंतर सर्व मुलांना मंचावर बोलावण्यात आले. मुलांनी एकत्रितपणे “हीच अमुची प्रार्थना, अन् हेच अमुचे मागणे” ही प्रार्थना सादर केली आणि कार्यक्रमाला अत्यंत प्रसन्न व संस्कारक्षम सुरुवात झाली.
दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा शुभारंभ
दीपप्रज्वलनासाठी विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रजापिता ब्रह्माकुमारी संस्थेच्या कार्यकर्त्या बी. के. नीता यांनी उपस्थिती लावली. त्यांनी मुलांना ध्यानाचे महत्त्व, एकमेकांशी कसे वागावे, एक माणूस म्हणून आपली काय जबाबदारी आणि कर्तव्ये आहेत, याबद्दल अतिशय हलक्या-फुलक्या आणि समजण्यास सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
“स्वप्न बघा, अभ्यास करा आणि एकत्र राहा,” असा प्रेरणादायी संदेश त्यांनी मुलांना दिला.
यामध्ये श्री अंबिका योग कुटीर, विलेपार्ले शाखेतील माननीय घाणेकर सर, श्रीमती रत्नप्रभा जोशी, विलेपार्ले येथील प्रथितयश व्यापारी श्री कमलेश चुग, मुंबई ग्राहक पंचायतीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या श्रीमती सविता दोंदे, संगीत क्षेत्रात ‘डी.एस. एंटरटेनमेंट’ या संस्थेच्या माध्यमातून कार्य करणाऱ्या श्रीमती स्वरा काटदरे तसेच संस्थेतर्फे सचिव श्री विनय पाटील यांचा सहभाग होता. कार्यक्रमाला उपस्थित पाहुणे, देणगीदार आणि हितचिंतकांचे स्वागत करण्यासाठी मुलींनी अतिशय सुंदर “आगतं स्वागतम्” हे स्वागतगीत सादर केले. त्यांच्या गोड आवाजाने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थितांची मने जिंकली.
योग, संस्कार आणि आरोग्याचा संदेश
घाणेकर सरांनी मुलांना प्रेमाने आशीर्वाद दिले आणि योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी आणि शिस्तबद्ध जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे सांगत मुलांना योग करण्यासाठी प्रोत्साहित केले. यानंतर मुलींनी आगामी गणेश जयंतीचे औचित्य साधत गणपतीच्या गाण्यावर सुंदर नृत्य सादर केले. त्यांच्या उत्स्फूर्त आणि आत्मविश्वासपूर्ण नृत्याला उपस्थितांनी भरभरून दाद दिली.
“तुमच्यासाठी जे झटले, त्यांची जाणीव ठेवा”
यानंतर श्रीमती रत्नप्रभा जोशी ताईंनी मुलांना अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी मुलांना सांगितले की, आज अनेक लोक तुमच्यासाठी वेळ देत आहेत, श्रम घेत आहेत आणि आर्थिक तसेच इतर प्रकारे मदत करत आहेत. उद्या तुम्ही मोठे झाल्यावर समाजासाठी असेच काहीतरी करण्याची जबाबदारी तुमची आहे.
त्यांनी अत्यंत साध्या पण मनाला भिडणाऱ्या शब्दांत सांगितले—“दहा पैशांमधील एक पैसा समाजासाठी खर्च करा. तुम्ही मोठे व्हा, खूप शिका; पण ज्यांनी तुम्हाला उभे राहण्यासाठी मदत केली, त्या भूतकाळाला आणि त्या माणसांना कधीही विसरू नका.”
हा संदेश मुलांच्या मनावर निश्चितच संस्कार करणारा ठरला.भक्ती आणि शिक्षणाचा सुंदर संगम
देवीच्या रूपातील नृत्याने रंगले वातावरण
यानंतर मुलींनी देवीवर आधारित एक सुंदर नृत्य सादर केले. भक्ती, कला आणि संस्कार यांचा सुंदर मिलाफ या सादरीकरणातून पाहायला मिळाला.
“शिकताना अडचण आली तर मला सांगा”
मॉड्युलर स्वयंपाकघराच्या क्षेत्रात कार्याची सुरुवात करणाऱ्या श्रीमती सुधा साठे यांनीही मुलांशी संवाद साधला. मुलांना कोणताही विषय शिकताना अडचण आली तर आपण त्यांना शिकवण्यासाठी वेळ देऊ, असे त्यांनी प्रेमाने सांगितले. समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या ज्ञानाचा उपयोग इतरांना सक्षम करण्यासाठी करावा, याचे हे सुंदर उदाहरण होते.
आदिवासी नृत्य ‘तारपा’ने जल्लोष
वस्तूंचे वर्गीकरण आणि गरजूंसाठी आवाहन श्रीमती अंजली आचरेकर यांनी संस्थेत येणाऱ्या वस्तूंचे व्यवस्थापन कसे केले जाते, याबद्दल माहिती दिली. घरात सामान आल्यानंतर त्यातील कपडे, भांडी आणि इतर वस्तू वेगवेगळ्या प्रकारे कशा वर्गीकृत केल्या जातात आणि त्याचे व्यवस्थापन कसे केले जाते, हे त्यांनी सांगितले. त्यांनी उपस्थितांना आवाहन केले की, संस्थेला मदत करताना चांगल्या स्थितीतील आणि प्रत्यक्ष वापरता येतील अशाच वस्तू द्याव्यात, जेणेकरून त्या मुलांच्या उपयोगी पडतील.
याशिकाचा वाढदिवस आणि मुलांसाठी प्रेमाची भेट
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या पाच वर्षांच्या याशिकाचा वाढदिवसही याच दिवशी होता.
आपला वाढदिवस केवळ स्वतःसाठी साजरा न करता, याशिकाने स्वतः आणलेल्या वस्तू मुलांना आपल्या हस्ते देण्याची इच्छा व्यक्त केली.
तिची ही निरागस इच्छा संस्थेने आनंदाने मान्य केली.
एका छोट्या मुलीने आपल्या वाढदिवसाचा आनंद इतर मुलांसोबत वाटून घेण्याची घेतलेली ही भूमिका उपस्थितांसाठीही प्रेरणादायी ठरली.
आचरेकर कुटुंबाच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक
संस्थेची वाटचाल पहिल्या दिवसापासून जवळून पाहणारे शेजारी श्री सुधाकर पांडलोस्कर यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. आई-वडिलांपासून संपूर्ण आचरेकर कुटुंबाने सामाजिक बांधिलकी कशी जपली आहे, याचा उल्लेख करत त्यांनी या कार्याचे मनापासून कौतुक केले.
संस्थेच्या व्यवस्थापक दाम्पत्याचा सत्कार
संस्थेचे व्यवस्थापक श्री विजय पवार आणि त्यांच्या पत्नी श्रीमती आदिती पवार यांच्या योगदानाबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
हा सत्कार स्वर्गवासी विश्वस्त श्रीमती माधवी बारगोडे यांच्या ज्येष्ठ भगिनी श्रीमती वंदना सामंत आणि श्री अविनाश सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.
या क्षणी माधवीताईंच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला.
मुलींच्या तत्परतेचे कौतुक
श्रीमती स्मृती नाईक यांनी सकाळच्या वेळेतील एक अनुभव सांगितला.
बस मध्ये सामान भरताना मुली ज्या तत्परतेने आणि उत्साहाने मदत करत होत्या, ते पाहून त्यांना खूप कौतुक वाटले. विशेष म्हणजे अवघ्या पंधरा मिनिटांत त्यांनी आपले काम पूर्ण केले आणि त्यानंतर साडी नेसून, व्यवस्थित तयार होऊन कार्यक्रमासाठी खाली आल्या.
मुलींची ही शिस्त, तत्परता आणि जबाबदारीची भावना त्यांनी विशेषत्वाने अधोरेखित केली.
आर्थिक मदतीचे आवाहन
श्रीमती स्वरा काटदरे यांनी संस्थेच्या पहिल्या दिवसापासून आर्थिक मदत केली आहे.
त्यांनी आपल्या मनोगतात समाजातील इतर व्यक्तींनीही संस्थेला आर्थिक मदतीचा हात द्यावा, असे कळकळीचे आवाहन केले.
संस्थेच्या कार्यासाठी सातत्याने मदत करणाऱ्या व्यक्तींचे योगदान किती महत्त्वाचे आहे, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले.
मुलींना कौशल्य आणि रोजगाराची संधी
विलेपार्ले येथे स्वतःचे पैठणी तसेच सण-समारंभासाठी लागणाऱ्या विशेष साहित्याचे दुकान असलेल्या श्रीमती दीपा चेउलकर यांनी मुलींना कला-कुसरीचे प्रशिक्षण देण्याची तयारी दर्शवली.
दुकानासाठी लागणाऱ्या काही साहित्यावर मुलींना कलाकुसर शिकवून त्यातून त्यांना थोडे अर्थार्जन करता यावे आणि त्याचबरोबर संस्थेलाही मदत मिळावी, असा सुंदर विचार त्यांनी मांडला.
मुलांना शिक्षणाबरोबरच कौशल्य, स्वावलंबन आणि रोजगाराच्या संधी मिळवून देण्याच्या संस्थेच्या उद्दिष्टाला या उपक्रमातून नवी दिशा मिळू शकते.
कृतज्ञतेने कार्यक्रमाची सांगता
कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या सचिव श्रीमती वैजयंती पाटील यांनी आतापर्यंत संस्थेला मदत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे तसेच आजच्या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
कार्यक्रमात सहभागी झालेल्या मुलांनी आपल्या कला सादरीकरणातून केवळ मनोरंजन केले नाही, तर त्यांच्यातील आत्मविश्वास, संस्कार, शिस्त आणि प्रतिभेचीही सुंदर झलक दाखवली.
समाजासाठी एक पाऊल...
विलेपार्ले येथील हा स्नेहमेळावा केवळ एक कार्यक्रम नव्हता. तो होता सेवा, संस्कार, शिक्षण, कला, स्वावलंबन आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम. एका बाजूला मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य होते, तर दुसऱ्या बाजूला त्यांना सक्षम करण्यासाठी झटणाऱ्या अनेक हातांची जाणीव होती. कोणी आर्थिक मदतीचे आश्वासन दिले, कोणी शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली, कोणी कौशल्य शिकवण्याची तयारी दर्शवली, कोणी कला सादर केली, तर कोणी आपला वेळ आणि अनुभव दिला. यातून एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवली— मुलांना केवळ आधार देणे पुरेसे नाही; त्यांना शिक्षण, संस्कार, कौशल्य आणि आत्मविश्वास देऊन स्वावलंबी बनवणे हीच खरी सेवा आहे. आणि म्हणूनच, “खूप शिका, मोठे व्हा; पण ज्यांनी तुम्हाला उभे राहण्यासाठी मदत केली, त्यांना आणि समाजाला कधीही विसरू नका.” हा संदेश या संपूर्ण कार्यक्रमाचा खरा गाभा ठरला. स्वामी आधारवर्धिनीच्या या सेवाकार्याला अशीच समाजाची साथ मिळत राहो आणि या मुलांच्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल उज्ज्वल भविष्याकडे जावो, हीच मनापासून प्रार्थना.🌞 Smart ETC - Save money, live better
GET Solar For Housing Society at Zero investement,Zero Maintainance,Free Solar System after PPA Tenor Solar Open Access Policy For Commercial & Industrial Client: (1)Captive Model. (2)Group Captive Model. (3)Third-Party PPA Model Without Colatral Finance & EMI MODEL For Solar Power Plant
. BOOK YOUR ORDERआपल्या घरात वाढदिवस मग तो वैयक्तिक असो अथवा लग्नाचा असो. किंवा घरात काही चांगले कार्य आहे उदा . सत्य नारायण पूजा, कोणतेही celebration आहे , बढती असो, गुढीपाडवा , दिवाळी सारखे सण असोत अथवा पितृपक्ष, मासिक पक्ष मध्ये ब्राह्मण भोजन असो . तर तुम्ही या साठी आश्रमातील मुलांना जेवण अन्नदान योजना अंतर्गत मदत करू शकता. प्रत्यक्ष येऊन द्यायचे असेल तर तुमचे स्वागतच आहे . परंतु येणे शक्य नसेल तर पैसे रुपात तुम्ही मदत करू शकता.
सकाळचा नाष्टा १००० रुपये शाकाहारी जेवण २५०० रुपये मांसाहारी जेवण ३००० रुपये अशी अन्नदान योजना आहे.
प्रगती आचरेकर ९९६९७४९५०२, आश्रमाचा पत्ता.... अकलोली,वज्रेश्वरी, ता.पालघर